रशियाच्या कीव्हवरील हल्ल्यात नऊ जण ठार   

झेलेन्स्की आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून परतले

कीव्ह : युक्रेनच्या राजधानीवर रशियाच्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू आणि ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. झेलेन्स्की यांनी समाज माध्यमावर म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना भेटल्यानंतर मी लगेच कीव्हला परतणार आहे. रशियासोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये झेलेन्स्की यांना दक्षिण आफ्रिकेकडून पाठिंबा मिळण्याची आशा आहे. 
 
कीव्हवरील हल्ला अशा वेळी झाला जेव्हा युद्धबंदी होत असल्याचे चित्र आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर हल्ला चढवत म्हटले आहे, की झेलेन्स्की क्रिमिया हा भाग रशियाला देण्यास तयार नसल्याने संभाव्य युद्धबंदी लांबली आहे. 

ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला

झेलेन्स्की यांनी अनेक वेळा सांगितले, की क्रिमियाला रशियाचा भू-भाग म्हणून मान्यता देणे हे त्यांच्या देशासाठी धोक्याचे लक्षण आहे. कीव्ह शहर लष्करी प्रशासनाने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर म्हटले आहे, की रशियाने ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी कीव्हवर हल्ला केला. यावेळी सुमारे ४५ ड्रोन आढळून 
आले आहेत. 
 
युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने सांगितले, की कीव्हमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ४२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळपासून ढिगार्‍याखाली दबलेल्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. कीव्हमधील किमान पाच भागांत पहाटे एक वाजण्याच्या सुमारास हे हल्ले झाले.

युक्रेनवरील प्राणघातक हल्ले थांबवा ट्रम्प यांचे पुतिन यांना आवाहन  

वॉशिंग्टन : युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबविण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की कीव्हवर रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे मी दुःखी झालो आहे. रशियाकडून हा हल्ला चुकीच्या वेळेत करण्यात आला आहे. पुतिन यांना मी हल्ले थांबविण्याचे आवाहन करतो. हल्ल्यांमुळे दर आठवड्याला पाच हजार सैनिकांचा मृत्यू होत आहे. हल्ले थांबवून चला शांतता प्रस्थापित करूया! असे ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. 
 

Related Articles